मुंबई - महानगरपालिकेच्या एस आणि टी विभाग प्रभाग समितीच्या निवडणुकांदरम्यान भाजपा आणि शिवसेना उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. मात्र, भाजपाच्या एका सदस्याचे मत बादकरून शिवसेनेचा उमेदवार विजयी करण्यात आला. हा निव्वळ फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगत भाजपाने आज महापौर आणि चिटणीस कार्यालयासमोर निदर्शने केली. महापौरांनी आणि चिटणीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
शिवसेना आणि भाजपा दोन्ही उमेदवारांना समान मते मिळणार असल्याने चिट्ठी टाकली जाईल, असे वाटले होते. भाजपाच्या सर्व सदस्यांची मते वैध होती. मात्र, महापौरांनी आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी जाणूनबुजून भाजपाच्या एका सदस्याचे मत बाद ठरवले. भाजपाच्या कोणत्या सदस्याचे मत बाद झाले हे पाहण्यासाठी आम्ही मतपत्रिका मागितली होती. मात्र, त्याची माहिती न देता महापौर पळून गेल्या. महापौरांच्या टेबलावरही ती मतपत्रिका नव्हती म्हणजेच महापौर मतपत्रिका घेऊन पळाल्या. महापालिका समितीच्या निवडणुकांमध्ये ज्याचे मत बाद होते त्याला ते दाखवले जाते. या निवडणुकीत असे काहीही झालेले नाही. आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी महापौरांनी पद पणाला लावले. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील ही काळी घटना आहे. त्यासाठी महापौरांचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली.
काय आहे प्रकरण -
मुंबई महानगरपालिकेच्या १७ प्रभाग समित्या आहेत. त्यापैकी मुलुंड आणि भांडुप येथील एस व टी विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. त्यासाठी भाजपाकडून जागृती पाटील तर शिवसेनेकडून दिपमाला बडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या प्रभाग समितीमध्ये भाजपाचे १०, शिवसेनेचे ८, काँग्रेस १ तर राष्ट्रवादीचा १ सदस्य आहे. प्रभाग समिती निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना व इतर पक्ष असे समीकरण होते. भाजपाला प्रभाग समितीच्या अध्यक्षपदापासून सुरू ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला मतदान केले. या निवडणुकीतही काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र, भाजपाचे एक मत बाद झाल्याने शिवसेनेच्या दिपमाला बडे या १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या जागृती पाटील यांना ९ मते मिळाली.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचे जास्त सदस्य असतानाही एक मत बाद झाल्याने पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोणाचे मत बाद झाले, याची माहिती मागण्याचा प्रयत्न भाजपा नगरसेवकांकडून केला जात होता. मात्र, काहीही न बोलता महापौर सभागृहाबाहेर गेल्या. चिटणीस असलेल्या संगीता शर्मा याही काहीही न सांगता निघून गेल्याने भाजपाने महापौर आणि चिटणीसांवर पळून गेल्याचा आरोप केला आहे. याबाबत भाजपाकडून महानगरपालिकेच्या चिटणीस असलेल्या संगीता शर्मा यांच्या गोरेगाव येथील घरासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर, आज महानगरपालिका मुख्यालयात महापौर किशोरी पेडणेकर आणि चिटणीस संगीता शर्मा यांच्या कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले.