मुंबई : बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही भाग आवाज कुणाचा या पॉडकास्टवर प्रसारित करण्यात आला आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षाने देखील ठाकरे यांच्या मुलाखतीवर टीकास्त्र सोडले आहे.
विधान परिषदेत बोला : मी माझ्या वाढदिवसानिमित्त मुलाखत देताना माझा संकल्प काय आहे, हे नम्रपणे सांगतो. मात्र, आम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत पाहिली. तेव्हा उद्धव ठाकरे त्याच त्या गोष्टी परत बोलत होते, असा हल्लाबोल शंभूराज देसाईंनी ठाकरे यांच्यावर केला आहे. विरोधी पक्षात असताना त्यांचा राज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? हे त्यांनी सांगायला हवे होते. ते एक दिवस विधान परिषदेत आले, तेथेही काहीच बोलले नाहीत. त्यांनी सूचना द्यायला हव्या होत्या. पण वर्षभरापासून त्याच त्या गोष्टी परत ते बोलत आहेत, अशी टीका देसाई यांनी ठाकरेंवर केली आहे.
फक्त सामना दैनिकालाच मुलाखत : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. गेल्या वर्षभरापासून ते फक्त सामना दैनिकालाच मुलाखत देतात. राज्यात इतरही वृत्तपत्रे, वाहिन्या आहेत. तिथे त्यांनी बोलले पाहिजे. बाळासाहेबांचे विचार आम्ही काल, आज आणि उद्याही पुढे नेणार आहोत. आम्ही सरकारकडून जनतेला न्याय मिळवून देत आहोत. एकदा आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे आम्ही नेहमी एकमेकांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्याचे दुःख : आज प्रसारित झालेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्याचे दुःख आहे असे, सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. उद्धवजींचा उद्या वाढदिवस आहे, सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी अजून मुलाखत पाहिलेली नाही. दुर्दैवाने 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी राज्यातील वातावरण दूषित करण्याचे काम केले. राज्यात आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे त्रिवेणी संगम सरकार आहे. येणाऱ्या काळात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार स्थापन करू शकणार नाहीत, असा दावा मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
दोघेही बेरोजगार-नितेश राणे : उद्धव ठाकरे टिकेला इतके महत्त्व का देतात तेच कळत नाही. संजय राऊत उद्धव ठाकरे दोघेही बेरोजगार आहेत. दोघांनाही कामधंदा नाही, असा घाणाघात नितेश राणे यांनी ठाकरे, राऊत यांच्यावर केला आहे. अशा मुलाखती देण्यापेक्षा विधान परिषदेत जनतेचे प्रश्न विचारले तर ठाकरेंना आणखी महत्व येईल, असा सल्ला देखील राणे यांनी दिला आहे. आपल्याच घरात बसून कामगाराला समोर बसवायचे अन् लाईट डिम करायची याला आंबट शौक म्हणातात, अशी जहरी टीका त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हेही वाचा - Maharashtra Monsoon session 2023 Updates: विरोधकांचा विधानसभेत सभात्याग, इगतपुरीच्या विषयावरून विरोधक आक्रमक