मुंबई - शनिवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार टीका-टिप्पणी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पीय अनुदानावर चर्चा करत होते. त्यावेळी सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र, याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात आहे. उलट सरकारने अफवा, गैरसमज दूर करण्याची भूमिका घेतली पाहिजे. दिल्लीत पंतप्रधानांशी भेटीनंतर सीएएचे समर्थन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंतर यू टर्न घेतला, अशी टीका करताच सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यावेळी भाजपने देखील आक्रमक रूप धारण करत चर्चा योग्य असल्याचे सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्र राज्य पणन महामंडळातील अधिकारी एन.बी.यादव यांच्या निलंबनाची मागणी मान्य
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले नियम सांगत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीचे मंत्री नबाब मलिक आणि हसन मुश्रीफ हे सभागृहात बोलताना वेगळा संदेश देतात, असा आक्षेप घेतला. तसेच कोरोनासंदर्भातील एनसीपी व्हायरसची सध्या जोरात चर्चा आहे, असे वक्तव्य केले. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी, भाजप म्हणजे 'भारत जलाओ पार्टी' आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांना प्रतिउत्तर दिले. तर मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचा भारत जलाओ व्हायरस असा उल्लेख केला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
सभागृह सुरू झाल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला आणि सभागृहाचे काम सुरळीत सुरू झाले. सभागृहात दोन्ही बाजूने केल्या गेलेले आक्षेपार्ह वक्तव्य मी तपासून कामकाजातून काढून टाकेन, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेवटी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाचा प्रभाव; मुंबई महापालिकेकडून बायोमेट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती