मुंबई - माझ्या जीवनात मी अनेक चढ उतार पाहिले. ईश्वराने दोन्ही परिस्थितीत मला खंबीरपणे राहायला शिकवले. जीवनात जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आले तेव्हा प्रमुख स्वामीजी महाराज यांचा हात माझ्या डोक्यावर होता, अशी आठवण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढली. स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाहंसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डी.वाय. पाटील आदी उपस्थित होते.
या जयंती महोत्सवात ६० हजार पेक्षा जास्त भक्त महानुभव उपस्थित होते. शिवाय बी.ए.पी.एस. संस्थेच्या ७५० अधिक साधूंनी हजेरी लावत प्रमुख स्वामीजी महाराज यांना आदरांजली वाहिली. तब्बल ३ तास चाललेल्या या महोत्सवात प्रमुख स्वामीजी महाराजांनी समाजाकरिता दिलेल्या योगदानाची प्रस्तुती करण्यात आली. या कार्यक्रमात 3 हजार पेक्षाही जास्त बालक - युवकांनी नृत्य - संवादाची विशिष्ट प्रस्तुती केली.
हेही वाचा - भाजप-प्रेमी साखर कारखानदारांना महाविकासआघाडीचा धक्का, 310 कोटींची बँक हमी रद्द
या जन्मजयंती महोत्सवात प्रमुख स्वामीजी महाराज यांना गुरुवंदना देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रमुख स्वामी महाराज यांच्यासह स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करताना शाह म्हणाले, की प्रमुख स्वामी महाराजांच्या सानिध्यात दिव्य शांतीचा अनुभव होत होता. कितीही कठीण प्रश्न असले तरी ते प्रमुख स्वामी महाराजांच्या सानिध्यात समाधान मिळत होते. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचा खूप जणांनी अनुभव घेतला आहे. त्यापैकी मी एक आहे, असं सांगून अमित शाह यांनी प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा - वैचारिक कट्टर पक्ष ते सत्तेचं हपापलेपण..! भाजपच्या परिवर्तनाचा प्रवास
यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह डी.वाय. पाटील स्टेडियमचे सूत्रधार विजय पाटील हे देखील उपस्थित होते. प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या जन्म जयंती महोत्सवात सेवारूपी भेट देण्याची परंपरा चालत आली आहे. मुंबईत साजरा झालेल्या जन्म जयंती महोत्सवात दादर इथले स्वामी नारायण मंदिर भेटरुपात उभारले. त्याचपद्धतीने ही परंपरा कायम राखत आजच्या जन्मजयंती महोत्सवात नवी मुंबईसाठी प्रमुख स्वामी कला केंद्राची घोषणा करण्यात आली. वाशी सेक्टर १० मध्ये हे स्वामीजी कला केंद्र उभारण्यात येणार असून, १० ऑक्टोबर रोजी याचे उद्घाटन करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले.