मुंबई- 'सारथी' संस्थेसाठी 23.66 कोटी रुपये देण्यात आले. मात्र, केवळ 2 कोटी 75 लाख रुपयेच योग्य ठिकाणी खर्च झाले असून 21.50 कोटींची रक्कम अन्य कामांवर खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिव किशोर निंबाळकर यांनी प्राथमिक चौकशी करून शासनाकडे अहवाल सोपवला असल्याची माहिती इतर मागास वर्ग विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी नेमला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
हेही वाचा- 'सीएए संदर्भात बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही'
गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी
मराठा, कुणबी, मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘सारथी’ संस्था स्थापन करण्यात आली होती. निंबाळकरांच्या अहवालानंतर मंत्री वडेट्टीवार यांनी आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारला अंधारात ठेवून पैसा अन्यत्र वळवला -
सारथी संस्थेसाठी मार्च 2019 पर्यंत 23.66 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र, तब्बल 21.50 कोटी रुपये अन्य कामांसाठीच खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अहवालात आहे. फक्त 2 कोटी 75 लाख रुपये उद्देशांसाठी खर्च करण्यात आले असून उर्वरित रक्कम अन्य प्रशासकीय कामांवर खर्च झाल्याचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सरकारला पूर्णपणे अंधारात ठेवून पैसा अन्यत्र वळवल्याचे समोर आले आहे.
चारा छावणी पोटी १२०० कोटी खर्च -
सदानंद मोरे यांच्या काळात आठ महिन्यात जाहिरात आणि संगणकावर पाच कोटी 41 लाख रुपये खर्च दाखवला आहे. सहा गाड्यांच्या खरेदीपोटी 80 लाखांची उधळपट्टी केली आहे.
गवर्षीच्या दुष्काळात बीड ६०८, उस्मानाबाद ३९६, अहमदनगर ५०४ असा चारा छावण्या होत्या. गतवर्षी चारा छावणी पोटी १२०० कोटी खर्च केले. बीड जिल्ह्यात चारा छावण्यांचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
डी.आर. परिहार यांची झालेली नियुक्तीही नियमबाह्य -
परिहार हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असून त्यांना प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांचा वापर करता येत नसताना त्यांनी तो केल्याचा आरोप होत आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीला वाटले म्हणून डी.आर. परिहार यांची झालेली नियुक्तीही नियमबाह्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते.
सारथीचा अतिरिक्त भार सचिव किशोर निंबाळकर यांच्याकडे -
खासदार संभाजीराजे भोसले यांनी सारथी संस्थेच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित करत उपोषण केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंना कारवाईचे आश्वासन दिले होते. सारथी संस्थेचा कार्यभार असणाऱ्या ओबीसी मंत्रालयाचे सचिव जे.पी. गुप्ता यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नेमणुकीपर्यंत सारथीचा अतिरिक्त भार पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव किशोर निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
सारथी संस्था बंद पडणार नाही -
परिहार यांनी दिलेला राजीनामा राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. आयएएस अधिकारी नेमून चौकशी आणि कारवाई करेल. सारथी संस्थेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, सारथी संस्था बंद पडणार नाही उलट सारथी संस्थेला आम्ही सक्षम करू, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर ओबीसींसाठी महाज्योती नावाची संस्था नागपूरमधे उभारणार, असे वेडट्टीवार यांनी शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले. राज ठाकरे यांचा मोर्चा आणि मुद्दा अजून स्पष्ट नाही ती भूमिका स्पष्ट होईल, त्यावेळी आपण बोलू, असे वडेट्टीवार म्हणाले.