मुंबई - लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्याचे पडसाद मुंबईत उमटले. लॉकडाऊनमध्ये काही तरी सुट मिळेल आणि आपल्याला गावी जाता येईल, अशी येथे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात रहाणाऱ्या परप्रांतीय मजूरांनी एक एक करत वांद्रे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अचानक उसळलेल्या या गर्दीमुळे पोलीसांची ही एकच तारांबळ उडाली.
मुंबईत काम करणारे बहुतांशी मजूर हे उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून येतात. हातावर पोट असणाऱ्या या मजुरांचा लॉकडाऊन वाढल्याने खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता गावी जाता येणार नाही. त्यामुळे आपले हाल होणार याची कल्पना त्यांना आल्यानेच त्यांनी गावी जावू द्या या मागणीसाठी वांद्रे स्थानका बाहेर मोठी गर्दी केली. जवळपास तीन हजारापेक्षा जास्त मजुरांचा जमाव काही काळ वांद्रे स्थानकाबाहेर होता. यावेळी पोलीसांनी या मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
लॉकडाऊन काळात अनेक मजूर मिळेल त्या साधनाने आपापल्या गावी गेले आहेत. पण, काही जण लॉकडाऊनमध्ये सुट मिळेल या अपेक्षेवर होते. मात्र, तसे झाले नाही. मुंबईतील वांद्रे परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्या मोठी आहे. रोजंदारीवर त्यांची उपजीविका चालते. पण, सर्वच बंद असल्यामुळे त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. मोदींच्या 21 दिवसांचा लॉकडाऊन आजपर्यंत (दि. 14 एप्रिल) होता. त्यामुळे आज रेल्वे सुरु होईल या आशेने दुपारपासूनच परप्रांतीय वांद्रे रेल्वे आणि बसस्थानक परिसरात जमा होत होते. पाहता पाहता हजारोंच्या संख्येने परप्रांतीय या ठिकाणी जमा झाले. यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी काही पोलीसही त्या ठिकाणी गेले. पण, गर्दी पोलिसांना जुमानत नव्हती. त्यानंतर पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली. सुरुवातीला त्यांची समजूत काढण्यात येत होती. त्यानंतर गर्दी पांगत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. रविवारी (दि. 12 एप्रिल) रोजी मुळचे उत्तर प्रदेशचे आणि मुंबई व परिसरात कामाला आलेले शेकडो मजूर उल्हासनगर रेल्वेस्थानकात जमा झाल्याची घटना ताजी असतानाच आज ही घटना वांद्रे स्थानकात झाली.
हेही वाचा - स्थलांतरित कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही- आदित्य ठाकरे