मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजावर भाजपला अधिक जागा मिळत असून काँग्रेस मागे पडत असल्याचे सांगितले जात असताना, आता मुंबईतील सट्टा बाजारात केवळ भाजप व काँग्रेसवर बेटिंग घेतली जात आहे. भाजप काँग्रेस वगळता सट्टा बाजारात इतर कुठल्याही पक्षावर पैसे घेतले जात नसल्याचे समोर येत आहे. सट्टा बाजारातील बुकींच्या अंदाजानुसार भाजपच्या १५ जागा वाढतील तर काँग्रेसला १० जागांचा फटका बसणार आहे.
सट्टा बाजारच्या अंदाजानुसार मतदानाच्या सातव्या फेरीनंतर भाजपचे पारडे जड झाले असून यामुळे मुंबईतला सट्टा बाजार काहीसा चिंतेत आला आहे. सुरवातीला काँग्रेसवर अधिक लक्ष देणारा सट्टा बाजार एक्झिट पोलच्या अंदाजावर भाजपला 260 ते 275 जागा मिळतील, असे सांगत असून कांग्रेस 100 चा आकडा गाठनार नाही, असे मुंबई सट्टा बाजार सांगत आहे.
एक्झिट पोलपूर्वी सट्टा बाजारात भाजप एकटा 275 पर्यंत जागा मिळवेल, असा अंदाज लावला जात होता. भाजपचे सरकार आल्यास 3 रुपये 50 पैशांचा भाव मिळत होता. मात्र, एनडीएचे सरकार आल्यास 12 पैशांचा भाव दिला जात होता. काँग्रेसच्या बाबतीत बोलायचे झाले तर 100 रुपयांचा भाव काँग्रेसच्या एकट्या येणाऱ्या सरकारवर लावला जात आहे. यूपीएचे सरकार केंद्रात आले तर 50 रुपये भाव दिला जात आहे. पण एक्झिट पोलच्या अंदाजनंतर हे सर्व भाव पडले असून आता नव्याने मुंबई सट्टा बाजारात भाजपच्या 232 जागांसाठी 32 पैसे , 240 जागांसाठी 52 पैसे , 254 जागांसाठी 82 पैसे, 265 जागांसाठी 1 रुपया 5 पैसे भाव दिला जात आहे. काँग्रेसच्या जागांवर मुंबईत सट्टा लावल्यास 60 जागांसाठी 28 पैसे, 65 जागांसाठी 65 पैसे, 70 जागांसाठी 80 पैसे भाव लावला जात आहे.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या पैकी कोण पंतप्रधान होणार याबद्दलही मुंबईत सट्टा बाजारात वेगवेगळा भाव आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार म्हणून सट्टा बाजार मानून चालले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यास 15 पैसे भाव असून राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास तब्बल 60 रुपयांचा भाव चालू आहे.