मुंबई: बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे बेमुदत आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांना तसेच मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील 20 आगरांमधील भाडे तत्त्वावरील १६७१ पैकी तब्बल 1375 बस बंद आहेत. अशा परिस्थितीत चार दिवसात आंदोलनाच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंत्राटदार कंपन्यांची आज बैठक बोलावली असून, या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाची संधी साधत रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर चालक दुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत.27 पैकी या 20 आगारांना कंत्राटी कामगारांच्या काम बंद आंदोलनाचा फटका बसला आहे. बेस्टच्या 27 पैकी बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतीक्षा नगर, आणिक आगार, धारावी, काळा किल्ला, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रुज, ओशिवारा, मालवणी, गोराई आणि माघाटणे अशा वीस आगारांमधील कामगार संपात सहभागी झाल्याने इथुन होणारी वाहतुक बंद आहे.
त्यामुळे या आगरांतून दररोज कामाच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भाडेतत्त्वावर बस पुरवणाऱ्या पुरवठादार संस्थांशी आम्ही बोलत आहोत. आज कंत्राटदारांची बेस्ट प्रशासनासोबत बैठक बेस्ट भवनमध्ये बोलवण्यात आली आहे. हा प्रश्न लवकर निकालात निघावा यासाठी बेस्ट प्रशासन देखील प्रयत्नशील आहे.
तोडगा काढण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांकडून कंत्राटी बस आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. कंत्राटदार संस्थेशी आम्ही करार केला आहे. एका बसमागे दररोज 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. बेमुदत आंदोलनामुळे बेस्टच्या बस थांबून राहतात. त्यामुळे त्या व्यतिरिक्त इतरही दंड बेस्ट आकारणार आहे.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने बेस्टने एसटी महामंडळाकडे जादा बस सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार बेस्टच्या सहा आगारांना प्रत्येकी 25 याप्रमाणे 150 गाड्या एसटी महामंडळाने पुरवल्या आहेत. बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत या गाड्या बेस्टला सेवा देणार असल्यामुळे राज्याची लालपरी बेस्टच्या मदतीला धावल्याचे चित्र आहे.