मुंबई - बेस्टकडून आपल्या प्रवाशांना नेहमीच नवीन सुविधा दिल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून प्रिमियम बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान ही बस सेवा सोमवार १२ डिसेंबर पासून चालवली जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
प्रिमियम लक्झरी बस सेवा - सार्वजनिक वाहतुकीचा वापर अधिक प्रमाणात व्हावा यासाठी बेस्टकडून प्रिमियम बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सिट्स, सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित, यूएसबी चार्जर आहे. खासगी बसमध्ये असलेल्या सर्व सुविधा या बसमध्ये प्रवाशांसाठी देण्यात आल्या आहेत. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसची तिकीट आणि सीट बुकिंग करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४ प्रीमियम बसेस दाखल झाल्या असून लवकरच २०० प्रिमियम बसेस दाखल होणार आहेत. नुकत्याच ४ प्रिमियम लक्झरी बस दाखल झाल्या असून ठाणे - बीकेसी दरम्यान जलद मार्गावर बस धावणार आहेत. तसेच संपूर्ण दिवस वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान ही बस प्रवाशांच्या सेवेत १२ डिसेंबरपासून धावणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.
प्रवाशांना असा होणार फायदा - नव्याने चलो अँप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांना १०० रुपयांत ठाणे - बीकेसी दरम्यान पहिल्या पाच फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या ५ फेऱ्यांचा प्रवास १० रुपयांत करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रवासी ज्या ठिकाणांहून तिकिट बुक करणार त्या ठिकाणांहून प्रवाशाला प्रवास करता येणार आहे.
बेस्ट प्रवाशांना या सुविधा - बेस्टकडून प्रवाशांना गारेगार प्रवास करता यावा म्हणून एसी बसेस चालवल्या जात आहेत. चालो अँपच्या माध्यमातून प्रवाशांना कमी खर्चात अधिक प्रवास करता येईल अशा योजना प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बस सध्या कुठे आहे, ती स्टॉप वर किती वेळात पोहचेल याची माहिती या अँपद्वारे प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.
प्रिमियम बसेसची वैशिष्ट्य - सीसीटीव्ही कॅमेरे, पुश बॅक सिट्स, सिट्स समोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित, यूएसबी चार्जर सुविधा
अशी असणार बस -
ठाणे ते बीकेसी जलद मार्ग - ठाणे येथून सकाळी ७, ७.३०, ८ व ८.३० वाजता सुटणार असून बीकेसी येथून संध्याकाळी ५.३०, ६, ६.३० व ७ वाजता सुटेल. ठाणे - बीकेसी दरम्यान २०५ रुपये तिकीट असेल. महिनाभराचा पास काढल्यास सुमारे ५० टक्के सूट मिळणार आहे.
संपूर्ण दिवस बस सेवा - वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान धावणारी प्रिमियम बस सेवा बीकेसी येथून सकाळी ८.५० व संध्याकाळी ५.३९ वाजता सुटणार आहे. तर वांद्रे स्थानक पूर्व येथून सकाळी ९.२५ वाजता व संध्याकाळी ६.२५ वाजता सुटणार आहे. वांद्रे स्थानक ते बीकेसी दरम्यान ५० रुपये तिकिट दर असेल. महिनाभराचा पास काढल्यास सुमारे ५० टक्के सूट मिळणार आहे.