मुंबई - कोरोनाचा प्रसार होत असल्याने राज्य सरकारने 14 एप्रिलपासून कडक निर्बंध लावला होता. ब्रेक द चैननुसार या निर्बंधात काही अंशी शिथिलता केली जात आहे. त्यानुसार मुंबईमधील बेस्टच्या बसेसला सोमवारपासून (दि.7 जून) पूर्ण आसन क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे बसमधील प्रत्येक सीटवर बसून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यामुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
निर्बंधात शिथिलता
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे राज्य सरकारने 14 एप्रिलला कडक निर्बंध जाहीर केले. रुग्णसंख्या कमी होत असल्याने सरकारने निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. 7जून) निर्बंधात शिथिलता देण्यासाठी 5 टप्पे करण्यात आले आहेत. मुंबई यात तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील नियमानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी
मुंबईमध्ये लोकल ट्रेन, बेस्ट बस, मेट्रो आणि मोनो ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आहेत. यामधील लोकल रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास मुभा नाही. यामुळे नागरिकांना बेस्टच्या बस सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्ट बसेस सध्या 50 टक्के प्रवाशांसाह चालवल्या जात आहेत. निर्बंधात शिथिलता देताना उद्यापासून बेस्टच्या बसमधील पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे बसमधून प्रत्येक सीटवर प्रवाशांना बसून प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसेस चालविल्या जाणार आहेत. तरी मुंबईकर प्रवाशांनी बसमधून प्रवास करताना तोंडावर मास्क लावून प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - शिक्षकांना द्या लोकल प्रवासाची मुभा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेशी मागणी