मुंबई : येत्या काही तासात २०२२ हे वर्ष संपणार असून २०२३ हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. मुंबईत नवीन वर्षाचे स्वागत (New Year celebrations ) करण्यासाठी मुंबईकर रात्रभर बाहेर असतात. अशा मुंबईकरांसाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत ५० अतिरिक्त बस चालवल्या जाणार आहेत. तसेच ५ ओपन डेक बसेस चालवल्या जाणार आहेत अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून (Mumbai Best Bus) देण्यात आली आहे.
५० जादा बसगाड्या : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असून मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत अतिरिक्त बसेस उपलब्ध केल्या आहेत. यंदा आठवडाभर आधीच झालेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने मुंबईतील विविध भागात ३१ डिसेंबर २०२२ रोजी मागील वर्षांपेक्षा दुप्पट म्हणजेच एकूण ५० जादा बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी आणि पर्यटकांनी या बेस्ट सेवेचा लाभ आपल्या कुटुंबियांसोबत घेऊन नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.
ओपन डेक बस : विशेष म्हणजे मुंबईकरांची पहिली पसंती असलेल्या दुमजली बस आणि गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता यंदाच्या थर्टी फर्स्ट व नव वर्षाच्या स्वागतासाठी ५ खुली दुमजली (ओपन डेक) बस ३१ डिसेंबर २०२२ च्या रात्रीपासून १ जानेवारी २०२३ च्या पहाटेपर्यंत चालविण्यात येणार आहे. त्यामुळे आता नवीन वर्षाचे स्वागत आणि नव्या वर्षाचा सूर्योदय पाहण्याची सुवर्णसंधी मुंबईकर नागरिक आणि पर्यटकांना मिळणार आहे.