मुंबई - बेस्ट उपक्रमाने सन 2020- 21 चा 2250 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प नुकताच बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प आज पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प तुटीचा असल्याने त्याला पालिकेच्या नियमानुसार मंजुरी देता येणे शक्य नसल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले. पालिकेकडून आर्थिक मदत दिली गेली असली तरी बेस्टकडून वाढीव आर्थिक तूट दाखवण्यात येत असल्याने रवी राजा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेला बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टवर सुमारे 2500 कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्टने 2020-21 च्या अर्थसंकल्पात विद्युत आणि परिवहन विभागात मिळून 5558 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असून 7808 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विद्युत पुरवठा विभागाचे उत्पन्न रुपये 4063.00 तर खर्च रुपये 3963.27 दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत विभागात 99.73 रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे. मात्र, ही शिल्लक विद्युत पुरवठा विभागाच्या भांडवली खर्चाकरिता वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन विभागाचे उत्पन्न 1495.91 रुपये तर खर्च 3845.38 रुपये अंदाजिण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन विभागात 2349.47 रुपयांची तूट अंदाजिण्यात आली आहे.
हेही वाचा - शेतकरी खंबीरपणे उभा राहावा आणि तरुण प्रगत व्हावा - धीरज देशमुख
बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही महिन्यात 2100 कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यानंतरही बेस्ट उपक्रमाने 2020-21 च्या अर्थसंकल्पात 2250 कोटींची तूट दर्शवली आहे. तूट असलेला अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. बेस्टचा 2019-20 चा 720 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प पालिकेने मंजूर न करता परत पाठवला होता. हा अर्थसंकल्पही पालिका अनुदान देईल या आशेवर पुन्हा पालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
पालिकेच्या नियमानुसार एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प असेल तरच तो मंजूर करता येतो. त्यामुळे हे दोन्ही अर्थसंकल्प मजूर करता येणे शक्य नसल्याचे विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी संगितले. पालिकेने 2100 कोटी रुपये देऊनही बेस्ट पुन्हा 2250 कोटींची तूट दाखवत असल्याबाबत रवी राजा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हेही वाचा - सायन पुलावर टेम्पोची दुचाकींना धडक, दोघांचा मृत्यू