मुंबई - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. मुंबईत अशा लाभार्थ्यांचे खासगी रुग्णालयातच लसीकरण केले जाईल, असे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आज राज्य सरकारने सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पालिका आयुक्तांनी आपल्या निर्णयावरून यूटर्न घेत २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमधील आणि खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
आयुक्तांचा यूटर्न
१ मेपासून १८ वर्ष ते ४५ वर्षापर्यंतच्या लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. हेे लसीकरण फक्त खासगी रुग्णालयातच केले जाईल, असे पालिका आयुक्तांनी जाहीर केले होते. तर ४५ वर्षावरील इतर लाभार्थ्यांचे पालिका आणि सरकारी रुग्णलयातच लसीकरण केले जाईल असेही पालिका आयुक्तांनी जाहीर केले होते. राज्य मंत्रिमंडळाने १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण मोफत केले जाईल, असा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर पालिका आयुक्तांनी आपला निर्णय बदलला आहे. पालिका आणि सरकारी ६३ लसीकरण केंद्रांवर ४५ वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरूच राहील. २२७ नगरसेवकांच्या विभागात प्रत्येकी एक लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. या लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाईल. खासगी रुग्णालयामध्ये ७३ लसीकरण केंद्र आहेत. त्यांची संख्या १०० पर्यंत वाढवली जाणार आहे. या खासगी केंद्रांवरही १८ वर्षावरील सर्व केंद्रांवर लसीकरण केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे. यामुळे १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे २२७ नगरसेवकांच्या विभागातील लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण केले जाईल.
काय होता आयुक्तांचा निर्णय
देशातील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोविड प्रतिबंध लस देण्याची मोहीम शनिवार, दिनांक १ मे, २०२१ पासून सुरू होणार आहे. मुंबईत कार्यान्वित असलेल्या महानगरपालिकेच्या आणि शासकीय अशा एकूण ६३ केंद्रांवर सद्यस्थितीप्रमाणे ४५ वर्ष वयावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला होता. १८ वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आयुक्त चहल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.
९० लाख लाभार्थ्यांना लस
मुंबईत १८ ते ४५ या वयोगटात अंदाजे ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी २ डोस याप्रमाणे सुमारे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे सर्व कळीचे मुद्दे आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लसीकरणाची वाढती व्याप्ती पाहता नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत, असे चहल यांनी नमूद केले होते.