मुंबई Devendra Fadnavis on Maratha Protest : राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) मंगळवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. सोमवारी बीडमध्ये (Beed Violence) घडलेल्या घटनेचं समर्थन करता येणार नाही. मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. आजही त्याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत. पण काही लोक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही : हिंसाचारामध्ये असलेल्या काही लोकांची ओळख पटली आहे. आम्हाला सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यात दिसणार्या व्यक्तींनी लोकांना जिवंत जाळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यामुळं कलम 307 अन्वये कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
आरक्षण देण्याबाबत वचन दिलं : मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात जे काही आंदोलन सुरू आहे, त्याबाबत राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत वचन दिलं आहे. यासाठी राज्य सरकारही पूर्णपणे ते वचन पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मंत्रिमंडळानेसुद्धा सकारात्मक निर्णय घेतले आहेत. परंतु काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींच्या घरी आगी लावणे, काही विशिष्ट समाजाच्या लोकांचे घर पेटवणे, हॉटेल व दवाखान्याचे नुकसान करणे अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली असून अशा लोकांवर पोलीस व गृह विभाग कडक कारवाई करेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हत्येचे गुन्हे दाखल करणार : राज्यात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस ऍक्शन मोडवर आहेत. हिंसाचार करून जर कोणाला मारण्याचा किंवा मालमत्तेचं नुकसान करण्याचा प्रयत्न होत असेल तर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल करणार आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना कोणतीही बंदी अथवा कारवाई केली जाणार नाही. पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवलाय. सुरक्षेसाठी अधिक तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळं आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
अतिरिक्त फौजफाटा मागविण्यात आला : अशाप्रकारे कोणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कोणाची प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न होत असेल तर पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. म्हणून या सर्व लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिथे शांततेत आंदोलन सुरू आहे, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. शांततेत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु हिंसेला कुठल्याही प्रकारची थारा देण्यात येणार नाही. यासाठी अतिरिक्त फौज फाटा मागविण्यात आलेला असून, त्यांना ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. जोपर्यंत अशा लोकांना पकडले जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई ही सुरूच राहणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
ओबीसी नेत्यांना संरक्षण : फडणवीस पुढे म्हणाले की, दुर्दैवाने ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडत होत्या त्यावेळेस काही राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्तेही यामध्ये सामील असल्याचं निष्पन्न होत आहे. या व्हिडिओ फुटेजची तपासणी केल्यानंतर त्याची माहिती सर्वांसमोर उघड केली जाईल. तसेच ज्या ठिकाणी ओबीसी नेत्यांना धमक्या आलेल्या आहेत किंवा त्यांना असुरक्षितता वाटत आहे अशा लोकांच्या बाबतीत पोलिसांना याची गांभीर्याने दखल घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच काही लोक फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना धमक्या देत आहेत. या धमक्या देणाऱ्या लोकांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
बीडमध्ये हिंसाचार : सोमवारी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची घरं जाळण्यात आली होती. त्यानंतर बीडमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या पार्श्वभूमीवर बीडसह धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती.
हेही वाचा -
- Uddhav Thackeray On Maratha Reservation : संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा अन्यथा खासदारांनी राजीनामे द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन
- Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीवरून आणखी एक आत्महत्या, मराठा समाज आक्रमक
- Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांकडून मराठा समाजाला शांततेचं आवाहन; म्हणाले, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार...