मुंबई - येथील मानखुर्द येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामधील (BARC) एका शास्त्रज्ञाने त्याच परिसरातील हीलियम प्लांटमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंपालाल प्रजापती (वय-44) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्लांटमध्ये फासावर लटकले -
चंपालाल प्रजापती (44) हे सुपरकंडक्टर्समध्ये निपुण असलेले राजस्थानमधील सुजानगडचे रहिवासी होते. ते टेक्निकल फिजिक्स डिव्हिजनचे वैज्ञानिक होते. मुंबईच्या मानखुर्द येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात ते कार्यरत होते. शुक्रवारी 10 सप्टेंबरला चंपालाल प्रजापती हे वेळेवर घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना फोन केला. त्यावेळी त्यांचा शोध घेतला असता हीलियम प्लांटमध्ये ते फासावर लटकलेले त्यांच्या सहकाऱ्यांना आढळले.
अपघाती मृत्यूची नोंद -
चंपालाल प्रजापती यांच्या सहकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती स्थानिक ट्रॉम्बे पोलिसांना दिली. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली तसेच पोलीस तपासात या घटनेत संशयास्पद काहीही आढळले नाही, अशी माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.