मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत परमबीर सिंग प्रकरणाबाबत चर्चा झाली. एखाद्या अधिकाऱ्याने पत्र लिहिले म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. तसेच या मुद्द्यावर तिन्ही पक्षाचे नेते बैठक घेतील. विरोधकांचे सर्व प्रयत्न सत्ता मिळवण्यासाठी सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत काल चर्चा झाली. त्या चर्चेचे मुद्दे घेऊन आज मुख्यमंत्री यांची भेट घेतली, असल्याची माहितीही थोरात यांनी दिली. भेटीत काही निर्णय व्हावा म्हणून भेट घेतली नाही. मात्र, परमबीर सिंह प्रकरणात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर सरकारची प्रतिमा मलिन नाही. या प्रकरणाबाबत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही; तपासाची दिशा बदलण्यासाठीच आरोप - पवार
परमबीर सिंग यांचा आरोप -
राज्यात सचिन वाझे प्रकरणावरुन तडकाफडकी बदली केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रत्येक महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. यानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - शरद पवारांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार