मुंबई - विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठे यश मिळाले आहे. पुढील काळातही महाविकास आघाडी यश मिळवत राहील. या निकालातून जनतेने विश्वास आणि आशीर्वाद दोन्ही दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
सुशिक्षितांनीही नाकारले भाजपाला -
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सामान्य जनता आमच्या पाठीशी उभी राहिली. आता सुशिक्षित मतदारही महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे राहिले आहेत. याचाच अर्थ असा की भाजपाची विचारसरणी आणि कार्यपद्धती सुशिक्षितांनीही नाकारली आहे. काँग्रेसच्या विचाराने हा देश पुन्हा आपल्याला बळकट बनवायचा आहे. विधानपरिषदेचा निकाल ही त्याचीच सुरुवात असल्याचे थोरात म्हणाले.
आजचा विजय हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ -
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठे यश मिळाले आहे. मी मित्रपक्षांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो. नागपूरचा जो मतदारसंघ गेली ५५ वर्ष कधीही काँग्रेसला मिळाला नव्हता, जो भाजपाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाला. मित्रपक्षांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळेच ही किमया करता आली, असेही थोरात म्हणाले. देशातील शेतकरी, कामगार हे तर पूर्णपणे भाजपाच्या विरोधात गेले आहेत. दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनातून भाजपा सरकार विरुद्धचा असंतोष बाहेर पडत असल्याचे थोरात यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचा चार जागांवर विजय -
महाविकास आघाडी निर्माण झाल्यापासून तीन पक्षांची एकत्रित पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये भाजपासमोर महाविकास आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले होते. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा भाजपा एकटा पक्ष सर्वांना पुरून उरेल, असेही म्हटले होते. मात्र, विधानपरिषदेच्या निकालानंतर वेगळे चित्र पहायला मिळाले असून एकूण 6 जागांपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे हे मोठे यश मानले जात आहे.