मुंबई - भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा मॅनहोलच्या दुरावस्थेमुळे फुटपाथ वरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये दोन पुरुषांना दुखापत झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी देखील भांडुपमध्ये अशीच घटना घडली होती. यामध्ये दोन महिलांना दुखापत झाली होती. वारंवार मॅनहोलच्या तक्रारी वाढत आहेत मात्र पालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
पादचारी मॅनहोलमध्ये पडून जखमी -
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत अनेक मॅनहोलची फायबरची झाकणे पाण्याच्या प्रवाहामुळे उघडली गेली आहेत. त्यात भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले होते. अशा परिस्थितीत या परिसरातील फुटपाथ वरून चालत असताना अचानक मॅनहोलमध्ये पाय जाऊन माणसे पडत असल्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. याची माहिती मिळतात मुंबई महानगरपालिकेचे पथक या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या गटाराचे झाकण दुरुस्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी अशीच घडली होती घटना
भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी दोन महिला फुटपाथवरील गटाराचे झाकण तुटल्याने पडल्याची प्रकार उघडकीस आले होते. काही दिवसांपूर्वी भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या. त्यावेळी अचानक या महिला एका मागोमाग एक या महिला या गटारात पडल्या. ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह हा कमी होता नाही तर या दोन्ही महिलांच्या जीवावर बेतले असते. भांडुपमध्येच दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक महिला मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे समोर आली होती. हा सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पुन्हा घडलेल्या घटनेने पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.