मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबई शहरात अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधात कारवाई केली जात असतानाच, चार फेब्रुवारी रोजी मुंबईतील कुर्ला परिसरांमधून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची चौकशीनंतर एका फरार आरोपीला मुंबईतील गोवंडी परिसरातून त्याच्या लग्न समारंभातून अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इब्राहिम शेख असे असून त्यास त्याच्या लग्नाच्या दिवशी एनसीपीच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेले आहे. इब्राहिम शेख यास न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी 15 फेब्रुवारीपर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आली आहे.
4 फेब्रुवारी रोजी कुर्ला परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन कुख्यात तस्करांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. हे आरोपी गेल्या काही वर्षापासून बांद्रा, कुर्ला आणि दक्षिण मुंबईतील काही भागात अंमली पदार्थाची तस्करी करत होते. जाकीर हुसेन शेख उर्फ बबलू पत्री व सहाब अली मोहम्मद हनीफ मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना अटक केल्यानंतर यांचा साथीदार इब्राहिम शेख हा फरार होता.
दरम्यान, बबलू पत्रीकडून करण्यात आलेल्या आरोपींकडून २० किलो कोडेन कफ सिरप, ५६ ग्राम एमडी अंमली पदार्थ व ४५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेला जाकीर हुसेन शेख याला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून २०१० व २०११ मध्ये विविध गुन्ह्यांखाली अटक झालेली होती. मात्र, जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा अंमली पदार्थांच्या वितरणाचे काम सुरूच ठेवले. एनसीबकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान या आरोपींनी वापरलेले चारचाकी वाहनसुद्धा जप्त करण्यात आले आहे.