मुंबई - वंचित बहुजन आघाडीचा बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारला आहे. कारण जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणीत भाजपला रोखू शकण्याची ताकद असलेल्या एकमेव काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यात वंचित आघाडीला अपयश आले आहे. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत मी मोदी-शहा विरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेला या आघाडीच्या भूमिकेमुळे तडा गेला आहे. याची मला खात्री पटली आहे. यापुढेही मोदी- शहांना रोखण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
वंचित विकास आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून अनेकदा काँग्रेससोबत चर्चा करण्याचे कबूल केले होते. त्यानंतर त्यांच्यात मध्यस्थीसाठी कालपर्यंत प्रयत्न केले. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी वंचित विकास आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करून चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे माझा या आघाडीला पाठिंबा राहिला तर अप्रत्यक्षपणे मोदीला मदत झाली असती, असे झाले असते तर मी कधीच स्वतःला माफ करु शकलो नसतो. कारण कुणाचीही हिंमत नसताना मोदी-शाह आणि संघमुक्त भारताची घोषणा केली होती, असे न्या. कोळसे-पाटील म्हणाले.
सर्व जाती धर्मातील आणि विशेषत: मराठा-कुणबी, एससी-एसएसटी, मुस्लिम बांधवांनी सर्वांच्या दु:खाचे मूळ शोधून त्यावर मात करून सर्वांना सुखी करण्यासाठी १९७६ पासून रात्रंदिवस काम करीत आहे. मी आता निवडणुक लढणार नाही. मात्र, शेवटच्या श्वासांपर्यंत या ब्राह्मण्यवादी व भांडवलशाहीलाही विरोध करणार आहे, असे ते म्हणाले.