मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे ‘आत्मनिर्भर चहा’ च्या स्टॉलचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, योगेश टिळेकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
भाजप नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद -
काल (बुधवार) मुंबई भाजप कार्यालयात भाजप नेत्यांची गेले दोन दिवस कार्यकर्त्यांशी संवाद आणि बैठक सत्र सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर 'आत्मनिर्भर टी स्टॉल' ह्या संकल्पनेचा शुभारंभ झाला. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्याचे सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभानसिंह पवैय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवस मुंबईत पक्षाची कोअर कमिटी, प्रदेश पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष इत्यादींच्या बैठका झाल्या. बैठकांमधील निर्णयांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.