मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी तक्रार दाखल केली असून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या लग्नाबद्दल व मुलांबद्दल माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, कायदा काय म्हणतोय या बाबत अॅड. असीम सरोदे यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
काय म्हणतो कायदा -
एकच लग्न करण्याची मुभा हिंदू विवाह कायद्यात आहे. कायद्याच्या चौकटीतून पाहिले असतात धनंजय मुंडे यांचे लग्न एकदाच झाले आहे. मात्र, तरी दुसऱ्या एका महिलेच्या सहवासात राहून त्यांना दोन मुले झाली आहेत. मात्र, तरीही हा गुन्हा ठरत नसल्याचे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. मात्र, निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये अपत्यांची माहिती लपवणे हा गुन्हा असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये त्यांची पत्नी किंवा त्यांच्या प्रेयसीकडून फसवणुकीची तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून कारवाई होईलच याची शाश्वती नाही. मात्र, निवडणूक आयोगाकडे जर या दोघींपैकी तक्रार आली तर यासंदर्भात कारवाई केली जाऊ शकते, सरोदे यांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण -
या महिलेचा आरोप आहे, 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचा लोभ धरुन त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. या महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. ही महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत, अशी माहिती मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही झाला होता असाच प्रकार -
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अपत्यांची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रात लपवली आहे. असाच काहीसा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत घडला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विवाह झाला असल्याचे स्पष्ट केले नव्हते. याबाबत वाद निर्माण झाल्यानंतर 2019च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांचा विवाह झाला असल्याचे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्र मध्ये म्हटले होते.