मुंबई - काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक चव्हाण निवडणूक लढण्यास उत्सुक नव्हते. येथून त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. पण, काँग्रेसने त्यांनाच निवडणूक लढण्यास सांगितले आहे. त्यांचा थेट सामना युतीचे उमेदवार प्रताप चिखलीकरांशी होणार आहे.
राज्यातील राजकारणात काम करायचे असल्याने दिल्लीत जाण्याची इच्छा नाही, असे चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना कळवले होते. पण, पक्षाने त्यांनाच निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट केले आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही अशोक चव्हाण ८२ हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले होते.
त्यांचे प्रतिस्पर्धी प्रताप चिखलीकर आहेत. चिखलीकर मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता युती झाल्यामुळे त्यांना दोन्ही पक्षांच्या मतांचा फायदा होईल, असे सांगितले जात आहे. अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकर दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने नांदेडमधील लढत उत्कंठावर्धक होणार असल्याचे बोलले जात आहे.