मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धी व द्वेषातून घेण्यात आल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करून चव्हाण यांनी केंद्र सरकार व भाजपवर सडकून टीका केली.
हेही वाचा - राज्याने ठरवावे खरे बोलणारे हवे की खोटे बोलणारे? - उद्धव ठाकरे
ते म्हणाले की, लोकशाहीत राजकीय विरोध असावा. पण, वैयक्तिक शत्रुत्व नसावे. मात्र, विद्यमान पंतप्रधान राजकीय विरोधकांना जणू व्यक्तीगत शत्रू समजूनच वागत आले आहेत. मागील 5 वर्षात भाजपच्या राजकीय सूडबुद्धीचा अनेकदा प्रत्यय आला आहे. गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढण्यामागेही राजकीय विद्वेष हेच प्रमुख कारण आहे.
हेही वाचा - ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा अखेर सुरळीत सुरू
आजवर गांधी कुटुंबातील 2 सदस्यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सुरक्षा काढताना किमान या बाबीचा तरी विचार करणे आवश्यक होते. पण, हे सरकार राजकीय सुडातून आंधळे झाले आहे. या सरकारची विवेक बुद्धी संपुष्टात आली आहे. गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढली गेली असली तरी भारतातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांच्यासाठी सुरक्षा कवचासारखे काम करेल, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.