मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज (शुक्रवार) आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. या वाढीव मोबदल्याची अंमलबजावणी १ जुलैपासून केली जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला होता.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका ७४ प्रकारचे विविध कामे करतात. त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो. मात्र, राज्य शासनाकडून २ हजार रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय २५ जूनरोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आग्रही भूमिका मांडली होती. त्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमीत ४ कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल २ हजार रुपयांपर्यंत दरमहा तसेच गटप्रवर्तकांना दरमहा ३ हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने आज जाहीर केलेल्या शासन निर्णयात नमूद केली आहे.