मुंबई - कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णांना लवकर ठणठणीत करत रुग्णांची संख्या कमी करण्याकरता मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. धारावीतील कोरोनाबधितांसह संशयित रुग्णांना 'अर्सेनिक अल्बम 30' या आयुर्वेदिक गोळया देण्यात येणार आहेत. त्यानुसार आजपासून हे डोस सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रुग्णांना तसेच संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्यांना 'अर्सेनिक अल्बम 30’ गोळ्या देणे परिणामकारक ठरेल, असे केंद्रीय आयुष मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. याच मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत पालिकेने धारावीत या सुचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी नुकतेच एक पत्र जारी करत याला हिरवा कंदील दिला आहे.
या पत्रानुसार या औषधांच्या वितरणासाठी आरुजू स्वाभिमानी नागरी समितीच्या माध्यमातून या गोळ्यांचे वितरण रुग्णांना केले जाणार आहे. आज या संस्थेच्या स्वयंसेवकांनी धारावीमध्ये काम सुरू केले आहे. आज रात्रीपासून रूग्ण आणि संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्याना या गोळ्याचे डोस देण्यात येतील, अशी माहिती जी-उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
दरम्यान, या औषधांचा कोणताही साईड इफेक्टस नसून केंद्राच्या सल्ल्यानेच या गोळ्या दिल्या जात असल्याचे दिघावकर यांनी सांगितले. धारावीबरोबरच पुढे माहीम आणि दादरमधील रुग्णांसह के पश्चिम विभागातील रुग्णांनाही या गोळ्या देण्यात येणार आहेत. तीन दिवस रुग्णाला या गोळ्या देण्यात येणार असून त्यामुळे रुग्ण बरा होत असल्याचा दावा केला जात आहे.