मुंबई - मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ड हॉस्पिटल हे 2 एप्रिल रोजी मुंबई महानगर पालिकेने कॊरोना रुग्ण आढळल्याने सील केले आहे. तर, आता या हॉस्पिटलमध्ये 40 नर्सेसना कॊरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती युनाटेड नर्स असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष जीबीन टी सी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तसेच, आज 40 नव्हे तर 250 हुन अधिक नर्सेसचा जीव केवळ आणि केवळ हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे धोक्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान रुग्णालयाचे विर्लेपार्ले येथील वसतीगृहही सील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या रुग्णालयामध्ये एक मार्च अखेरिस एक रुग्ण दाखल झाला होता. त्यावेळी त्याला कॊरोनाची काहीही लक्षणे नव्हती. मात्र, नंतर लक्षणे जाणवू लागल्याने 27 मार्चला त्याची चाचणी केली गेली, तेव्हा हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. यानंतर रुग्णालयाने ही माहिती कर्मचाऱ्यांना देत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नर्स, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, रुग्णालयामार्फत तसे न करता उलट ही बाब लपवून ठेवली. नंतर ही बाब उजेडात आली आणि 2 एप्रिलला पालिकेडून हे रुग्णालय सील करण्यात आले. मात्र, तोपर्यंत काही जणांना कॊरोनाची लक्षणे जाणवू लागली आणि रुग्णालयामध्ये एकच खळबळ उडाली.
पालिकेने रुग्णालय सील केल्यानंतर आता क्वारंटाईन आणि आयसोलेशन योग्य प्रकारे होत आहे. मात्र, 27 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान रुग्णालयाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आमच्या 265 नर्सेसचा जीव धोक्यात आल्याचा आरोप जीबीन यांनी केला आहे. या नर्सेसना वेळेत पीपीई किट दिले असते, त्यांना क्वारंटाईन केले असते तर आता 40 नर्स या कॊरोनापासून बचावल्या असत्या. तसेच, उर्वरित नर्सेसचाही धोका कमी झाला असता. त्यामुळे याला व्यवस्थापन जबाबदार असल्याचाही आरोप जीबीन यांनी केला आहे.
रुग्णालयामध्ये एका खोलीत 8-8 नर्स राहतात. त्या एकाच वाहनातून प्रवास करतात. याचाही विचार रुग्णालय व्यवस्थापनाने केला नाही. त्यामुळे आता इतर नर्सनाही कोरोनाची लागण होण्याची भीती वाढली आहे. दरम्यान, परिस्थिती पाहता आता कुठे हे रुग्णालय सील करत इतर नर्सेसना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या नर्सेसमध्ये 80 टक्के नर्स केरळच्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जीबीन यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केरळ सरकारला याप्रकरणी लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.