मुंबई - प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लंपी चर्मरोगाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रवीण दराडे, महादेव जानकर, एकनाथ खडसे यांनी देखील प्रश्नांची सरबत्ती करत सरकारला धारेवर धरले. (Lumpy disease vaccine ) या सर्व प्रश्नाला विखे-पाटील यांनी उत्तरे दिली आहेत त्यावेळी त्यांनी राज्यात लस तयार केली जाईल अशी घोषणा केली आहे.
मार्गदर्शक सूचना - राज्यातील काही जिल्ह्यात लंपी आजार बळावला होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. राज्य शासनाने 100 टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याने विशिष्ट पद्धती अवलंबल्याने लसीकरण पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्विकारल्याचेही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे.
आर्थिक मदतीबाबत शासन सकारात्मक - पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासराला 16 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र, यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच, राज्यात पशुधनाला अनेक आजरांचा सामना करावा लागतो. यात लाखो रुपयांचे पशुधन दगावण्याची शक्यता असते. यामुळे पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जागा भरणार - आतापर्यंत 3383.85 लाख रुपयांचा निधी मृत पशुधनाच्या पशुपालकांना वाटप केला आहे. उर्वरित पशुपालकांना 15 दिवसांत मदत देण्यात येईल. पशुवर स्वतः उपचार केले असल्यास शेतकऱ्यांना योग्य परतावा दिला जाईल. शिवाय पशुसंवर्धन दवाखान्यातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही उप प्रश्नाला उत्तर देताना विखे-पाटील यांनी सांगितले आहे.
काय आहे लंपी - लंपी व्हायरस(Lampi Virus) हा एक विषाणूजन्य त्वचारोग आहे, जो गो व महिष या वर्गातील जनावरांना होत आहे. हा आजार कॅप्री पॉक्स या विषाणू प्रवर्गातील आहे. लंपी हा आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी येतात. त्या कड्क गाठी असतात, लंपी हा आजार सर्व वयाच्या गाई व म्हशी यांना होत आहे. लहान जनावरांना हा आजार जास्त प्रमाणात होत आहे. हा आजार मानवास होत नाही, तसेच शेळ्या मेंढ्या यांना सुद्धा हा आजार होत नाही.
लंपीचा प्रसार - लंपी आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांच्या रक्तात लंपी विषाणू हा 1 ते 2 आठवडे राहतो. लंपी या आजाराचा संक्रमण कालावधी हा 4 ते 14 दिवस असतो. हा विषाणु शरीराच्या सर्वच भागात पसरतो. हा आजार ज्या जनावरास होतो, त्या जनावरांपासून हा आजार दुसऱ्या जनावरास संक्रमण होऊन पसरतो. हा विषाणू जनावरांची लाळ, त्यांच्या डोळ्याला येणारे पाणी आणि नाकातील खाव यांच्या माध्यमातून जनावरांना देण्यात येत असलेल्या चारा खाद्य पाणी याच्या माध्यमातून दुसऱ्या जनावरांना होत आहे. जनावरांच्या वीर्यामधूनही या आजाराचे संक्रमण होत आहे.