मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचे राजकारण करण्यात आले. या प्रकरणाद्वारे राज्य सरकार, युवा नेते व पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एम्सच्या रिपोर्टमुळे हा प्रयत्न फसला आहे. सुशांतसिंह प्रकरणात जे छाती बडवत होते त्यांच्या मुस्काटात एम्सने मारली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समितीची निवडणूक सोमवारी संपन्न झाली. शिक्षण समिती अध्यक्ष पदावर संध्या दोषी यांची तर स्थायी समिती अध्यक्ष पदावर यशवंत जाधव यांची निवड झाल्यावर परब यांनी ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना, सुशांतसिंह प्रकरणात जे छाती बडवत होते त्यांच्या मुस्काटात एम्सने मारली आहे. बिहार निवडणुकीत राजपूत मते मिळतील यासाठी हे सर्व सुरू होते. हा प्रयत्न फसला असल्याचे परब यांनी सांगितलं. शिवसेना आणि आमच्या नेतृत्व आणि युवा नेत्यांना बदनाम केले गेले. याची भरपाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करत अब्रु नुकसान कसे भरून काढायचे ते शिवसेनेला चांगले माहित असल्याचेही परब म्हणाले.
स्थायी समिती अध्यक्ष पदावर यशवंत जाधव यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तर शिक्षण समिती अध्यक्ष पदावर संध्या दोषी यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला मतदान केले आहे. राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या मतदानावर शिवसेनेचा उमेवार पहिल्यांदाच निवडून आला आहे. याबाबत बोलताना शिवसेनेला आपली मते मिळाली आहेत. त्याचबरोबर राज्यात तीन पक्षाचे सरकार चांगले काम करत आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला मतदान केले आहे, असे परब यांनी सांगितलं.
हेही वाचा - मुंबई महापालिका स्थायी समिती अन् शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
हेही वाचा - 'जेईई अॅडव्हान्स'मध्ये पुण्याचा चिराग फलोर पहिला तर मुंबईचा स्वयम छुबे देशात आठवा