मुंबई - कोरोना संक्रमण पाहता राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या काळात अनेकांचा रोजगार गेला. मुंबईत लॉकडॉऊनमुळे बेरोजगार झालेल्या एक तरुणाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये ही घटना घडली. पुनीत राणा (वय 27) या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे.
समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ऑक्टोबरच्या रात्री एक व्यक्ती गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी एटीएम सेंटरच्या आत जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हा गॅसकटर व गॅस सिलेंडर जागेवर टाकून पळून गेला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने गॅस कटरने एटीएम कापण्याची माहिती यूट्यूबवरून मिळवल्याचे सांगितले.
लॉकडाऊनमुळे झाला होता बेरोजगार -
अटक केलेला आरोपी पुनीत राणा हा लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो पैसे कमवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत होता. यूट्यूबवर एटीएम कशाप्रकारे कापून त्यातील पैसे चोरता येतील याचा व्हिडिओ त्याने पाहिला. यासाठी त्याने पाच किलो वजनाचे एलपीजी गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, कटर मशीन असे 15 हजार रुपयांचे साहित्य विकत घेतले होते.