मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Elections) तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाने मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. भाजपने मतदार संघ निहाय जबाबदाऱ्या सोपवल्यानंतर महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. आज आघाडीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महत्वाची बैठक पार पडली. दरम्यान, ताब्यात असलेल्या जागा वगळता उर्वरित जागांबाबत उद्या फैसला होईल, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve informed) यांनी दिली.
पाच जागांसाठी निवडणूक : विधान परिषदेचे सदस्य डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधान परिषद सदस्य येत्या 7 फेब्रुवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने 29 डिसेंबरला महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक तर नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहेत.
दोन जागांसाठी निर्णय : येत्या 30 जानेवारीला ही निवडणूक होणार असून 2 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपाने मतदार संघनिहाय निवडणूक प्रमुख नेमले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची देखील आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितरित्या लढणार आहोत. कोकण, नाशिक आणि औरंगाबाद या जागा ज्यांच्याकडे आहेत, त्यांनीच या जागा लढवायच्या आहेत. उर्वरित जागांबाबत उद्या (11 जानेवारी) निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने कंबर कसली : सध्या विधान परिषदेच्या 21 जागा रिक्त आहेत. राज्यपाल नामनियुक्त 12 आणि सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, जळगाव, भंडारा- गोंदिया या 9 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. याशिवाय, या पाच सदस्य 7 फेब्रुवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत. भाजपाचे विधान परिषदेत 22 इतके संख्याबळ आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे 28 सदस्य आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.