मुंबई - मुंबईत अँटीजन कोरोना टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. मान्यता प्राप्त खासगी लॅब आणि सरकारी लॅबमध्ये ही रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. पण आता टेस्टची संख्या वाढवण्यासाठी आणि निदान लवकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व खासगी प्रयोगशाळांना अँटीजन टेस्ट करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र ) ने केली आहे.
आतापर्यंत राज्यात आरटी-पीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी होत होती. पण आता मात्र अँटीजन टेस्ट पद्धती आली असून त्यामुळे आता केवळ अर्ध्या तासात कोरोनाचा अहवाल प्राप्त होत आहे. निदान वेळेत झाल्याने उपचार वेळेत मिळत आहेत. त्यामुळे आता मृत्यू दर कमी होण्यास मदत होणार आहे. पण सध्या राज्यात केवळ 48 खासगी लॅब यांनाच ही चाचणी करण्याची परवानगी आहे. जेव्हा की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेअंतर्गत नोंदणी असलेल्या 5 हजार लॅब आहेत. यापैकी ज्यांना ही अँटीजन टेस्ट करायची असेल त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी राज्य सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे.
सरसकट परवानगी दिल्यास टेस्टचे प्रमाण वाढेल. संशयितांना जवळच्या ठिकाणी जाऊन टेस्ट करता येईल, टेस्टचा अहवाल अर्ध्या तासात येईल आणि त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, असे म्हणत डॉ. भोंडवे यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान राज्यातील पॅथोलॉजी संघटनेने ही मागणी आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते हेच पाहणे महत्वाचे आहे.
हेही वाचा - ग्रामीण भागात प्रत्येक घराला पाणी; जल जीवन मिशन राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
हेही वाचा - राजगृह हल्ला : दोन संशयित ताब्यात... मोबाईल सिडीआरचीही तपासणी