मुंबई - आज जागतिक परिचारिका दिवस आहे. त्यानिमित्त दुपारी १२ वाजता परिचारिका आपल्या घरात अथवा कामाच्या ठिकाणी मेणबत्ती किंवा दिवे लावून कोरोना युद्धात जोखमीचे काम करत असलेल्या परिचारिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणार आहेत. शिवाय कोरोनाचा प्रादूर्भाव लवकरात लवकर थांबावा यासाठी देखील प्रार्थना केली जाणार आहे.
मुंबईतील जेजे रुग्णालय, कामा, सेंट जॉर्ज, जीटी, राज्यातील वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तब्बल 26 हजार पेक्षा अधिक परिचारिका कार्यरत आहेत. या सर्व या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र गव्हरमेंट नर्सेस फेडरेशनच्या सेक्रेटरी कमल वायकोळे यांनी सांगितले. मुंबईत राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या रुग्णालयात सध्या अडीच हजार पेक्षा परिचारिका कार्यरत आहेत. या परिचारिका थेट कोविड रुग्नाच्या संपर्कात येत असतात. त्यांना योग्य वैद्यकिया साहित्य मिळायाला हवे. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक परिचारीका कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. पीपीई किट घातल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामाचे तास कमी करावेत, एक दिवस सुट्टी मिळावी, सुट्टीनंतर सबंधित परिचारिकेला इतर वॉर्डमध्ये ड्युटी मिळावी जेणेकरून कोविडचा संसर्ग कमी होईल. राज्य सरकार या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत फेडरेशनने व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या युद्ध काळात परिचारिकेचे महत्त्व -
डॉक्टर रुग्णावर उपचार करतात. मात्र, रुग्णांचा सेवा कोण करतं? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर, नाव येईल परिचारिका. आता कोरोना युद्धाच्या काळात रुग्णाजवळ नातेवाईक नाही, कोणी नाही. त्याला एकटे आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. मात्र, त्याची सेवा करण्यासाठी परिचारिका त्याच्याजवळ असते. त्याला खरा आधार परिचारिकेचा असतो. कोरोना रुग्णांची सेवा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी त्यांना रुग्ण, तर कधी सोसायटीमधील लोक त्रास देतात. त्या कोरोना रुग्णांची सेवा करत असल्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, या भीतीने त्यांना त्यांच्याच घरापासून, कुटुंबापासून लांब ठेवल्याचा घटना देखील घडल्या आहेत. मात्र, आपल्या कुटुंबापासून दूर राहत, आपल्या जीवाची पर्वा न करता त्या आपले कर्तव्य बजावत आहे. आज १२ मे म्हणजे जागतिक परिचारिका दिन आहे. त्यानिमित्त सर्वांनी परिचारिकांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणे गरजेचे आहे.
का साजरा करतात जागतिक परिचारिका दिवस? -
फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेने रुग्णसेवेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १२ मे १८२० ला फ्लॉरेन्स यांचा जन्म झाला. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी जखमी सैनिकांची सेवा-सुश्रुषा केली. त्यांनी रात्रीच्यावेळी सर्व सैनिकांवर उपचार केले होते. त्यामुळे त्यांना 'लेडी विथ लॅम्प' सुद्धा म्हणतात.
आपल्यासारख्या अनेक परिचारिका तयार व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी १८६० साली लंडन येथील सेंट थॉमस हॉस्पीटल येथे पहिलं नर्सिंग स्कूल काढलं. त्यामुळे आज जगभरात परिचारिकांना महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जातो.
कोरोनाच्या काळात परिचारिकांची भूमिका -
- कोरोनाची सुरुवात चीनच्या वुहान प्रांतामधून सुरुवात झाली. त्याठिकाणी कोरोनाशी लढण्यासाठी जवळपास २८ हजार परिचारिकांना पाठविण्यात आले होते. त्याचाच परिणाम आता वुहान प्रांत पूर्णपणे कोरोनामुक्त झालेला आहे.
- इंग्लंडमध्ये ज्या परिचारिकांनी नर्सिंग सोडले होते, त्यांना परत रुजू होऊन कोरोनाच्या संकटकाळात मदत केली.
- परिचारीकांनी आतापर्यंत पहिल्या महायुद्धापासून तर स्पॅनिश फ्लू,सार्स, स्वाईन फ्लू, इबोला यासारख्या महामारीच्या काळात एक योद्धा म्हणून भूमिका बजावली.
भारतात कोरोनाच्या काळात परिचारिकांची भूमिका -
भारतात कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हापासून परिचारिका कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. न थकता, कुटुंबाची आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. सध्या भारतात ३.०७ मिलियन नोंदणीकृत परिचारिका आहेत. तसेच आपल्या देशात १.७: १००० असा परिचारिका आणि रुग्णांचे गुणोत्तर आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेनुसार ३:१००० असा परिचारिका आणि रुग्णांचे गुणोत्तर आवश्यक आहे.
कोरोना काळात परिचारिकांना येणाऱ्या समस्या -
आरोग्य कर्मचारी म्हणून परिचारिका कोरोना महामारीच्या काळात योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, पीपीई किटचा तुटवडा असल्यामुळे त्यांना व्यवस्थित पुरवठा होत नाही. तसेच इतर सुरक्षेच्या साधनांचा देखील तुटवडा आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी काही परिचारीकांना कोरोनाची लागण झाली आहे.
परिचारीका रुग्णाच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त आहे. तसेच आपल्याला कोरोनाची लागण होईल, या भीतीने सोसायटीतील लोकांकडून त्यांना वाईट वागणूक मिळणे. तसेच कुटुंबापासून दूर ठेवण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक तणाव येत असतो.
देशातील पहिलं नर्सिंग स्कूल -
१८६० ला इंग्लंडमध्ये पहिलं नर्सिंग स्कूलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भारतात १८६७ मध्ये दिल्ली येथील सेंट स्टिव्हन्स हॉस्पीटल येथे नर्सिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यात आले.