मुंबई - कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर रेमडेसीवीर हे इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा वापर व पर्यायाने मागणी वाढली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत खासगी रुग्णालयांनी रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरू केल्याचा आरोप होत आहे. खासगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या वा गंभीर नसलेल्या रुग्णांच्या नावाचे प्रिस्क्रिप्शन बनवत या इंजेक्शनचा साठा करत असून कृत्रीम टंचाई निर्माण करत असल्याचा आरोपही ऑल फूड अॅन्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनने केला आहे.
टंचाईच्या नावाखाली ज्यादा दरात या इंजेक्शनची विक्री गरजूंना करत त्यांची लूट करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) याकडे लक्ष देत या काळ्या बाजाराला आळा घालावा अशी मागणीही आता होत आहे. पण एफडीएने मात्र रेमडेसीवीरच्या काळ्या बाजाराचा आरोप फेटाळला असून, मागाणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने थोडी अडचण होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
रेमडेसीवीर उपयोगी ठरत असल्याने देशातील काही कंपन्याना या इंजेक्शनच्या उत्पादन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता ही इंजेक्शन बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. तर मुंबई महानगर पालिकेने तर थेट हैदराबादवरून 15 हजार इंजेक्शन मागवले आहेत. आतापर्यंत 5 हजार इंजेक्शन आले असून, त्याचे वाटप पालिका रुग्णालयात करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयात अशी कोणतीही टंचाई नसून काळाबाजारचा प्रश्न येथे तरी येत नसल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
ऑल फूड अॅन्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनने मात्र खासगी रुग्णालय रेमडेसीवीरचा काळाबाजार करत असल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार आपण एफडीएकडे केल्याची माहिती फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. खासगी रुग्णालये स्वार्थापोटी लक्षणे नसलेला रुग्णांच्या नावे प्रिस्क्रिप्शन तयार करत या इंजेक्शनचा साठा करत आहे. तर कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचा आरोपही पांडे यांनी केला आहे. साठा केलेले इंजेक्शन मग जादा दरात गरजूंना विकली जात आहेत. दरम्यान, या फाऊंडेशनकडून आता बांगलादेशमधील एका कंपनीकडून पाच हजार इंजेक्शन मागवण्यात येणार आहेत.
डी. जी. गहाणे, सहआयुक्त (बृहन्मुंबई) औषध, एफडीए यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. या फाऊंडेशने पत्र दिले पण कोणत्या रुग्णालयात असा प्रकार होत आहे याची यादी वा नावे दिलेली नाहीत. ती द्यावी आम्ही तत्काळ कारवाई करू असेही ते म्हणाले. त्याचवेळी रेमडेसीवीरची मागणी वाढली आहे. तर पुरवठा थोडा कमी असून तो लवकरच सुरळीत होईल. कारण त्यासाठी आम्ही थेट कंपनीशी बोलत असून लवकरच उत्पादन वाढेल असेही ते म्हणाले.