मुंबई : 2021-22 या कालावधीमध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे त्यांना कोकणामध्ये, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यात अटकेच्या टांगत्या तलवारीला सामोरे जावे लागले होते. तसेच राज्यात काही ठिकाणी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
सार्वजनिक वक्तव्यामुळे राज्यात आंदोलने : भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा राज्यामध्ये ठिकठिकाणी आयोजित केली गेली होती. एका सार्वजनिक सभेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्या वेळेला भाषण करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्गार काढताना, 'मी जर त्या ठिकाणी असतो तर त्यांच्या कानशिलातच लगावली असती' अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांच्या या सार्वजनिक वक्तव्यामुळे राज्यात ठीकठिकाणी प्रति आंदोलने देखील झाले होते. त्यामुळेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये नारायण राणे यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले होते. या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राणे यांच्याविरोधात राज्यभरातून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
आरोपातून दोष मुक्तता : नारायण राणे यांनी अलिबाग न्यायालयामध्ये याबाबत जनतेमध्ये कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण करणे हा हेतू नव्हता, असे सांगितले. तसेच माझ्या संदर्भात कारवाई करत असताना भारतीय दंड विधान कलमाच्या अनुसार प्रक्रिया न राबवताच थेट नोटीस बजावली गेली, असे देखील त्यांनी आपल्या याचिकेत अधोरेखित केले होते. त्यामुळेच सर्व तथ्य आणि पुरावे यांच्या आधारावर अलिबाग न्यायालयाने नारायण राणे यांची कथित आरोपातून दोष मुक्तता केली. नारायण राणे यांची दोष मुक्ती झाल्यामुळे विविध न्यायालयांमध्ये फेऱ्या घालणे आणि तिथला ससेमिरा आता संपणार आहे.