मुंबई Ajit Pawar Vs Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना शरद पवारांचं वय काढलं. वय झालं तरी माणूस थांबत नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, शरद पवार समर्थकांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा अनोख्या पद्धतीनं निषेध केलाय. सोमवारी (8 जानेवारी) शरद पवार समर्थकांनी अजित पवार गटातील नेत्यांचं वय सांगत केक कापला. तसंच अजित पवार गटातील हे नेते रिटायर कधी होणार? असा सवालही यावेळी करण्यात आला.
- अजित पवार गटाकडून सातत्यानं शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यामुळं याचा निषेध म्हणून शरद पवार गटाचे नितीन देशमुख, अमोल मातेले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी अजित पवार गटातील वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं वय सांगत वाढदिवस साजरा केला.
सुनील तटकरे-68, छगन भुजबळ-76, हसन मुश्रीफ- 69 आणि प्रफुल्ल पटेल हे 66 वर्षाचे आहेत. अजित पवार सुद्धा 65 च्या वर गेलेत. त्यामुळं या नेत्यांनी पुन्हा-पुन्हा शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करू नये. महाराष्ट्राला सुद्धा या नेत्यांची वय कळावीत या दृष्टीनं हे वाढदिवस आम्ही साजरे करत आहोत-शरद पवार गटाचे नेते नितीन देशमुख
नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया : यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार गटाचे नेते नितीन देशमुख म्हणाले की, अजित पवार गटाकडून सातत्यानं शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला जातो. वास्तविक राजकारणामध्ये उमेद आणि काम करण्याची इच्छा महत्त्वाची आहे. शरद पवारांकडं अजूनही महाराष्ट्र पिंजून काढण्याची धमक आणि काम करण्याची वृत्ती आहे. आता असं असताना ज्या नेत्यांची वय 65 वर्षांपेक्षा अधिक झालीत, तेच नेते शरद पवारांना वयाचे सल्ले देत आहेत.
काय म्हणाले होते अजित पवार : अजित पवार गटाच्या मुंबई विभागाचा कार्यकर्ता संवाद मेळावा रविवारी (7 जानेवारी) कल्याणमध्ये पार पडला. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले की, वय झाल्यानंतर आपण थांबायचं असतं. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झालं की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही, असं ते म्हणाले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे आता ज्येष्ठ नागरिक आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा -