मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने निवडणुकीत उडी घेतल्याने त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार हे राजकीय विश्लेषकांनी आधीच सांगितलं होतं. त्याचप्रमाणे काँग्रेसला तो फटका बसताना पाहायला मिळतो आहे. अद्याप काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी समोर आली नसली तरी मिळालेल्या कलानुसार त्यांना फटका दिसत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. (ajit pawar reaction on gujrat election 2022).
काय म्हणाले अजित पवार ? : हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसला विजय मिळवता आला असला तरी नुकत्याच झालेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 'आप'ने बाजी मारली आहे. त्यामुळे निवडणुकीचे मिश्र निकाल पाहायला मिळत आहेत, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मात्र त्यांचा विजय सुकर झाला नाही. ते पराभूत होतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पक्ष बदलल्यामुळे हार्दिक पटेल याला लोकांनी प्रतिसाद दिला असं वाटत नाही. तसेच या निवडणुकांमध्ये ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी पुढच्या वेळेस अजून जोमाने कामाला लागावे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
कर्नाटक बँकसाठी राज्यसरकार सकारात्मक : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असताना राज्यातलं शिंदे फडणीस सरकार कर्नाटक बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वळवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तीन बँकांसोबत करार झाला होता. यामध्ये राष्ट्रीयकृत बँका सर्वात पुढे होत्या. मात्र आता कर्नाटक बँकेचे नाव समोर येत आहे. तसेच कर्नाटक राज्या बद्दल शिंदे फडणवीस सरकारलाच आपलेपणा निर्माण झाला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमक भूमिका घेतात त्याचप्रमाणे राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे. केंद्र सरकारने लवकरात लवकर या सर्व मुद्द्यावर हस्तक्षेप करणे गरजेचे आहे".
ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे पानिपत झाले : शिवसेनेत मोठी फूट पडली एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडीचे सरकार पाडलं. मात्र माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक वेळा शिवसेनेत फूट पडलेली पाहिली. मात्र फूट पाडून बाहेर पडलेले मोठे राजकीय नेते त्यांचे देखील पानिपत झालं असल्याचा इतिहास आहे याची आठवण अजित पवार यांनी यावेळी करून दिली. त्यामुळे शिवसेनेचा मतदार येणाऱ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याच मागे उभा राहील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.