मुंबई - आमच्या घरात कोणत्याही प्रकारचा गृहकलह नाही. या सर्व बातम्या माध्यमांमध्ये पेरलेल्या आहेत. आमचा परिवार मोठा असला तरी कुटुंब प्रमुखांचे (शरद पवार) आम्ही ऐकतो. आमचे घर आजही एकत्र आहे. कुटुंबातील रोहित, पार्थ यांना देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरून, तर कधी कुटुंबाविषयी काहीही वावड्या उठवण्याची गरज नाही. आम्ही आजही एकत्र आहे आणि राहणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - ...अन् अजित पवारांना रडू कोसळले, म्हणाले आम्हालाही भावना असतात
शुक्रवारी अजित पवारांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याविषयी राजकीय चर्चा, तर्क-वितर्कांना उधान आले होते. यानंतर आज दुपारी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याचे कारण माध्यमांसमोर स्पष्ट केले.
हेही वाचा - साहेब जो आदेश देतील तो मान्य, राजीनाम्यानंतर अजित पवारांचे स्पष्टीकरण
आपल्यामुळे या वयात शरद पवारांना त्रास होऊ नये म्हणून आपण राजीनाम्याच्या निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले. माझ्या सदविवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. मात्र, माझ्या सहकाऱ्यांना माझ्या या राजीनामा देण्याचा त्रास झाला. माझ्या सर्व सहकाऱ्यांना याबाबत सांगितले असते तर त्यांनी मला राजीनामा देण्यापासून अडवले. मात्र, मी त्यांच्या भावना दुखावल्या त्यासाठी मी माफी मागतो. शुक्रवारी मी राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना मी तीन दिवसांपूर्वी फोन केला होता. काही दिवसांपासून माझ्या मनात ही भावना होती. मात्र, हा निर्णय घेताना पक्षाला काही नुकसान होऊ नये याचाही विचार मी करत होतो. राजीनामा देणे माझी चूक झाली की नाही मला माहीत नाही, असेही पवार म्हणाले.