मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, आता ईव्हीएमविषयी चर्चा करू नका अशा चर्चेत वेळ न घालवता विधानसभेत आघाडीला सत्तेत आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज मुंबईत केले.
काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व हे वेगळे आहे, आणि ते कायम राहील. काही दिवसांत राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी चर्चा काहींनी चालवली होती, आता जर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाबद्दल कोणी चर्चा आणली तर ती तिथल्या तिथे खोडून काढा, असे आवाहनही पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. राज्य सरकारच्या कामकाजावर राज्यात एकही घटक समाधानी नाही. मल्टिनॅशनल कंपन्यांचे रोजगार कमी झाले. नवीन रोजगार उपलब्ध केले जात नाहीत, यामुळे येत्या विधानसभेत आघाडीचे सरकार आल्यास जेवढ्या जागा रिक्त असतील त्या ठराविक काळात भरल्या जातील, त्यासाठी भूमिका घेतली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.
या सरकारने धनगर, मराठा आरक्षणाचा भुलभुलय्या केला आहे. या सरकारचे आम्ही अनेक घोटाळे विधांमडळात आणले. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचे घोटाळे झाकत राहिले. त्यामुळे असेच विषय घेऊन जनतेत जायचे आहे. मात्र, विषय चर्चेत वेळ न घालवत आपला पक्ष आणि आघाडीला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करा आणि कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही राज्यात पाण्याचा विषय घेत आहे. त्यासाठी प्रबोधन आणि जनजागृती आम्हाला करायचे आहे. हे सरकार जलसंधारण हा विषय घेऊन जनतेत जाते, पण 7 हजार कोटी रुपये खर्च करून एक थेंब पाणी साचून राहिले नाही.
राज्यातील गावे दुष्काळाने होरपळून जात आहे. मुंबईत ट्राफिकचे मोठे प्रश्न आहेत, कोस्टल रोडचे काम आत्ता कुठे सुरू करत आहेत, मुंबईत ज्या घोषणा या सरकारने दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या नाहीत, या सरकारने मध्यमवर्गीय लोकांचा खिशा कापला, कर घ्यायला हरकत नाही, पण तो चुकीच्या पद्धतीने घेतला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत आम्ही राज्यातील मुख्य प्रश्न आम्ही घेऊन गेलो, परंतु सत्ताधारी लोकांनी पुलवामा, गुहेत जाऊन बसून विषय दुसरीकडे नेले. मात्र, सामान्य माणसाचे प्रश्न सुटले नाहीत, यामुळे कुठेही जल्लोष झाला नाही, जे प्रचार भाजपचे लोक करत होते, त्यांनाही मतदानानंतर विश्वास बसत नाही. यामुळे लोकांसमोर पुन्हा प्रश्न घेऊन जाऊ या. पुढील तीन महिने पायाला भिंगरी लावून फिरणार आहोत. ज्या जागा आपल्या वाट्याला येतील त्यावर ताकदीनिशी काम करावे. आपण काही जागांवर लक्ष देऊन काम केले पाहिजे. सर्वांच्या ताकदीने आपण राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करू या. अपयशाने खचून न जाता जनतेकडे जा, आपला पराभव झाला असला तरी आपण त्यांचे प्रश्न घेऊन जाऊया. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याचे काम करू, असे आवाहन पवार यांनी केले.