मुंबई - हिंदू संकृतीमधील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या सणावर कोरोनो व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न निघता घरातच साधे पणाने गुढीपाडवा साजरा करावा असे, आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवारांनी आपल्या निवासस्थानी अतिशय साधे पणाने गुढी पाडवा साजरा केला. पुत्र पार्थ पवार यांच्यासह केवळ कुटुंबातील व्यक्तींची यावेळी उपस्थिती होती.
हेही वाचा- ''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''
पाडव्याच्या निमित्ताने अनेकदा घरात गोड-धोड जेवणावळीचा बेत असतो. मात्र, यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारने लॉकडाऊन करुन संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच बसावे. स्वत:सह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावे, असे आवाहन पवार कुटुंबीयांनी केले आहे.
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी 519 वर पोहोचली. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्युमुळे देशातील करोनाबळींची संख्या 10 वर गेली. देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, टाळेबंदी झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत असल्याने आवश्यकता भासल्यास संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. अखेर केंद्राने 21 दिवसांची देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली.