मुंबई - मराठा आरक्षणासाठी राज्यभरात अनेक मोर्चे निघाल्यानंतर याबाबत राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ ला सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू केले. मात्र नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे मराठा समाजातील मेडिकल प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसईबीसीच्या माध्यमातून प्रवेश नाकारण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने एसईबीसीच्या माध्यमातून सुरू केलेले मेडिकल प्रवेश अचानक रद्द केल्याने राज्यातील हजारो मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा मराठा समाजातील २५० विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाबाबत कुठलाही खास निर्णय न झाल्याने आज मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरूवात केली आहे. मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाबाबत मुख्यमंत्री जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.