मुंबई - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील इंग्रजांविरुद्धच्या भारत छोडो या घटनेला आज ६७ वर्षे झाली आहेत. याच धर्तीवर काल (शुक्रवार) देशभरात ईव्हीएम भारत छोडो आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाच्या काल (शुक्रवार) मुंबईत स्वातंत्र्यवीर स्मारक ते चैत्यभूमीपर्यंत ईव्हीएमला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.
केंद्रातील सध्याचे सरकार हे लोकांच्या मतावर निवडून आलेले नसून. ते ईव्हीएम सरकार आहे. या सरकारने केलेली चोरी उघड झाली आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करून विजय मिळवला आहे. त्याविरोधात आता देशभरात जन आंदोलन उभारलेले आहे. लोक तसेच विविध सामाजिक संस्था संघटना रस्त्यावर देशभरातील जनआंदोलन करण्यासाठी उतरलेले आहेत, अशी माहिती ईव्हीएम विरोधी संयोजक फिरोज मिठी बोरीवाला यांनी दिली.
काल (शुक्रवार) देशभरातील शेकडो शहरात एकाच वेळी ईव्हीएम विरोधी आंदोलन करण्यात आले. मुंबई दादर येथील चैत्यभूमी ते ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मोर्चा होणार होता. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा ईव्हीएम विरोधी जन-आंदोलन कार्यकर्त्यांनी केला नाही. त्यामुळे ईव्हीएम विरोधी जन आंदोलन समितीने शिवाजी पार्क स्वातंत्र्यवीर स्मारक ते चैत्यभूमीपर्यंत हा मोर्चा काढला. यात अनेक नागरिक विविध विद्यार्थी संघटना यात सहभागी होत्या.
शिवाजी पार्कहून चैत्यभूमीला हा मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबविले. म्हणून ईव्हीएम विरोधी कार्यकर्ते व लोकांनी सरकार विरोधात व पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. पोलिसांकडून आमच्यावर दबाव टाकला जातो आहे, असे आमदार विद्या चव्हाण यांनी सांगितले.