मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षांना सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे ११ ऑक्टोबरपासून पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेचेही वेळापत्रक सीईटी सेलकडून उपलब्ध करून देण्यात आहे. हे हॉलतिकीट सीईटी सेलच्या https://info.mahacet.org/cet2020/LL.B5/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून ते विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.
उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेतील पीसीबी ग्रूपच्या परीक्षा या १ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या असून त्या ९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. तर त्यापुढे पीसीएम ग्रूपच्या १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. याच दरम्यान विधी पाच वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा ही ११ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेकदा पुढे ढकलण्यात आलेल्या तीन वर्ष विधी परीक्षेची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. ही सीईटीची परीक्षा ही २ नोव्हेबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सीईटीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले हॉलतिकीट डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.