मुंबई - सलग तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईवर आपत्ती ओढवली आहे. मात्र, मुंबईकरांनी पॅनिक होऊ नका, एकमेकांना मदत करा, असे आवाहन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईत गेले चार दिवस पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने मुंबईत सर्वत्र पाणी साचले. त्यानंतर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ठप्प झालेल्या मुंबईतील परिस्थितीचा पालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुंबई महानगपालिकेची आपत्कालीन व्यवस्था ही इंटरनॅशनल स्टॅडर्डनुसार आहे. नाल्यांची क्षमता ही ५० मिमी एवढीच असते. तीस दिवसात पडणारा पाऊस केवळ तीन-चार दिवसात पडला असल्याने ही आपत्कालीन परिस्थिती ओढवली. गरज नसेल तर बाहेर पडू नका, पॅनिक होऊ नका, एकमेकांची मदत करा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणीही मॅनहोल उघडू नये असे त्यांनी म्हटले. मुंबईत पाणी उपसण्यासाठी महापालिकेने आणखी तीन पंपिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी ही कामे पूर्ण होतील. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा मुंबईकर म्हणून एकमेकांची मदत करा, असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला.
मुंबई महापालिकेचे कर्मचारी तसेच सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे मुंबईची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. पावसाचा फटका प्रत्येकालाच बसत आहे. महापालिका हतबल आहे, असे मी म्हणणार नाही. कारण जगातली कोणतीही महापालिका अशा आपत्कालीन परिस्थितीत काहीही वेगळे करू शकत नाही, असे सांगत ठाकरे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.