मुंबई - वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी रॅली काढली. आपल्याला निवडून देण्याचे साकडे रॅलीच्या माध्यमातून आदित्यने मतदारांना घातले.
येत्या २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लढवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदार संघाची निवड केली. आदित्य शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्याने त्यांना राज्यात प्रचार दौरे करावे लागत आहेत.
हेही वाचा - 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल'
आदित्य राज्यात दौरे करत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा नगरसेवक, आमदार व शिवसैनिकांवर टाकण्यात आली आहे. निवडणुकीचा प्रचार येत्या शनिवारी सायंकाळी संपेल. मतदारांना भेटण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये रॅली काढली. या रॅली दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनीही यावेळी आपल्याला मतदान करण्याचे साकडे मतदारांना घातले.
या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे यांचा भाऊ तेजस ठाकरे, स्थानिक आमदार सुनील शिंदे, माजी मंत्री सचिन अहिर, नगरसेवक, नगरसेविका आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.