मुंबई - युवासेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना लाखो शिवसैनिकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात निवडून येऊन जनतेचे आधारस्तंभ बनावे, अशा शुभेच्छा शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. त्यामुळे आदित्य यांच्या निवडणूक लढवण्याचा चर्चेला बळ मिळाले आहे.
आदित्य ठाकरे यांना त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी हा विषय टाळला. मात्र, सेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी आदित्य यांना थेट आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्याने ते निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्तात तथ्य असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मातोश्री येथे आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच समाजोपयोगी कामासाठी म्हणून युवा सेवा फाऊंडेशनला धनादेश दिला. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या, ठाकरे घरण्याचे कुणीही विधीमंडळात आतापर्यंत आले नसले, तरी आदित्यजी आले तर मोठ्या प्रमाणात सामान्यांना आधार मिळेल व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आधारस्तंभ म्हणून लोकांचे काम करता येईल. त्यामुळे त्यांनी विधिमंडळात यावे, नेत्तृत्व करावे अशा शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे, वहिनी रश्मीताई ठाकरे यांच्या संस्कारातून आदित्य संवेदनशील नेतृत्व म्हणून काम करत आहेत. मात्र, वेगवेगळ्या पध्दतीने त्यांच्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. राज्याच्या कुठल्याही मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात, असेही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना सांगितले.