मुंबई - खड्डेमुक्त, कचरामुक्त तसेच रोगराईमुक्त वरळी या त्रिसूत्रीनुसार वरळीचा विकास करण्यासाठी पालिका आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. यावेळी वरळीमध्ये राबवण्यात येणारी रोगराईमुक्त वरळी ही संकल्पना मुंबईमधील सर्व विभागात रावबावली जावी, यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नुकत्याच झालेल्या वरळी विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यावर आदित्य ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. त्यानंतर आमदार म्हणून त्यांनी पहिल्यांदाच पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेतली.
हेही वाचा - एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला, भाजपमध्ये नाराजी सत्र सुरूच
या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांशी वरळीमधील विकासकामांची चर्चा केली. वरळीमध्ये रोगराईमुक्त वरळी ही संकल्पना नागरिकांच्या सहकार्याने राबवली जात आहे. अशीच संकल्पना मुंबईत राबवून रोगराईमुक्त मुंबई संकल्पना राबवली गेली पाहिजे. त्यासाठी मुंबईमधील सर्व विभागातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
हेही वाचा - 'ओबीसी असल्याने भाजपकडून पंकजा मुंडेंचे खच्चीकरण'
मुंबईत नव्या बेस्टच्या बसेस धावणार आहेत. त्यामुळे बेस्टची सेवा आणखी सुधारेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर या रस्त्याचा व फुटपाथचा सांस्कृतिक पद्धतीने विकास केला जाणार आहे. आदी विषयांवर आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.