मुंबई : गेल्या काही दिवसांपासून युवा सेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झाले आहेत. ते महापालिकेतील विविध कामासंदर्भात आक्षेप घेणारे पत्रे मुंबई पालिका आयुक्तांना लिहित आहेत. आज स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रश्नांचा भडिमार करणारे पत्र लिहिले. नवा दिवस - नवी लूट, अशा शब्दांत त्यांनी मुंबई मनपाच्या कामांवर हल्लाबोल केला.
स्ट्रीट फर्निचर खरेदीबाबत आयुक्तांना पत्र : निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर मुंबई मनपाचे काम प्रशासक पाहत आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाअंतर्गत कामांच्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. सरकारने केलेल्या वारेमाप घोषणा करदात्या मुंबईकरांची फसवणूक करणाऱ्या असून तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या आहेत, असा आक्षेप आदित्य ठाकरे यांनी नोंदवला आहे. त्यासाठी ते सातत्याने आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी पत्रव्यवहार करत आहेत. आता आदित्य ठाकरे यांनी स्ट्रीट फर्निचर खरेदीबाबत नवे पत्र आयुक्त चहल यांना लिहिले आहे.
मनपाने भूमिका स्पष्ट करावी : एका मुंबईकराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आयुक्त असमर्थता दाखवत असल्यामुळे रस्त्यांप्रमाणेच हाही घोटाळा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. असेच पत्र सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानेही लिहिले होते, पण मला विश्वास आहे की त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे ते म्हणाले आहेत. आता मी आणखी एका संभाव्य घोटाळ्याबद्दल मुंबई मनपा आणि पालिका आयुक्त यांना पत्र लिहीत आहे. महापालिकेने यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांची सरबत्ती : आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबई मनपाकडून अनेक कामांत अनियमितता आढळून येत आहे. मुंबईत बीएमसीने निर्माण केलेल्या रस्त्यावरील फर्निचरच्या गोंधळाबद्दल मला आणखी स्पष्टता हवी आहे. मुंबई मनपा ठेकेदारासाठी आणि सरकारमध्ये असलेल्यांना फायदा व्हावा, या हेतूने काम करत आहे. त्यामुळेच रस्त्यावरील फर्निचरसाठी एका कंत्राटदाराने 263 कोटी रुपयांची निविदा काढली आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. तसेच खरेदीची निविदा सीपीडीकडून का काढण्यात आली, रस्ते विभागाकडून का नाही?, कंत्राटदार/पुरवठादाराने मनपाला आवश्यक असलेल्या सर्व 13 वस्तू खरेदी करणे का आवश्यक आहे? खरेदीद्वारे कोणत्या वस्तू किती प्रमाणात मागवल्या गेल्या? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
'सर्व प्रश्नांची उत्तरे द्या' : आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे, मनपावर आरोप झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या 3 सदस्यीय तथ्य शोध समितीचा अहवाल, VJTI चा सर्व बोलीदारांचा गुणवत्ता चाचणी अहवाल, बीएमसीच्या रस्ते आणि वाहतूक विभागाची आणि शहरी नियोजक/सल्लागारांच्या आवश्यकतेवर टिप्पणी, शहरी नियोजकांची निवड EOI द्वारे करण्यात आली होती की अनियंत्रितपणे? केली गेली का?, अशा प्रश्नांचा भडीमार केला आहे. तसेच याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी खडी घोटाळा, सॅनिटरी पॅड घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा उघडकीस आणला. आता फर्निचर खरेदीबाबत तक्रार केली आहे. या सर्व प्रश्नांची आयुक्तांनी उत्तरे द्यावीत, असे आदित्य ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.