मुंबई- आयआयटी मुंबईतील पदवीच्या बी. डीईएस (B.Des-2020) डिझाईन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १ नोव्हेंबर रोजी युसीईईडी-२०२१ ही सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी, व्यवस्थापन क्षेत्रातील डिझाईन या क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बी. डीईएस या प्रवेशासाठी आत्तापर्यंत आयआयटी मंबईकडून तीन प्रवेश फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच जागा शिल्लक राहिल्या असल्याने या रिक्त राहिलेल्या जागांच्या प्रवेशासाठी १ नोव्हेंबर रोजी युसीईईडी-२०२१ ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. आत्तापर्यंत प्रवेशासाठी झालेल्या तीन फेऱ्यामंध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत, मात्र त्यांनी प्रवेश घेतला नाही, त्यांनाही या अतिरिक्त प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना युसीईईडी-२०२१ च्या अतिरिक्त प्रवेश फेरीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आयआयटी मुंबईच्या संकेतस्थळावर जाऊन पुन्हा एकादा आपला अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपलब्ध जागांची माहितीही आयआयटी मुंबईच्या युसीईईडी-२०२१ साठीच्या http://www.uceed.iitb.ac.in/2021/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अतिरिक्त प्रवेश फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व कागदपत्रांची नीट पडताळणी करून घ्यावी, अन्यथा त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील, यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयआयटी मुंबईकडून करण्यात आले आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपासून नोंदणी शुल्कासोबत आपला अर्ज भरता येणार असून त्यासाठी अखेरची तारीख ही २४ ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र त्यासाठी अतिरिक्त ५०० रूपयांचे शुल्क विद्यार्थ्यांना अदा करावे लागणार आहे.