मुंबई - आरेमध्ये अदानी इलेक्ट्रिकल कंपनी अवैधरित्या खोदकाम करत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी आणि जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीच्या खोदकामाला स्थगिती देण्यात आली आहे.
हेही वाचा - 'आरे कारशेड' बंदी मागे घ्या, किरीट सोमय्या यांची राज्य सरकारकडे मागणी
मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे यांनी आरेतील एकही झाड तोडू देणार नसल्याचे म्हटले आहे. आरे कॉलनीत अदानी इलेक्ट्रिकल कंपनीकडून वीज पुरवठा करणारे वायर टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम आणि वृक्षतोड करण्यात आल्याचे तक्रारदारांनी म्हटले होते. याचीच दखल घेऊन अदानी इलेक्ट्रिकल कंपनी पर्यावरणाच्या आणि हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत या कामाला स्थगिती देण्यात आली असल्याचे आमदार रवींद्र वायकर यांनी सांगितले आहे.